न्यूजपेपर मधील बातमी,
चालण्याच्या बाबतीत भारतीय लोक आळशी देशांपैकी एक!
आज पाऊस आहे नको जायला!
आज रविवार सुट्टीचा दिवस,
आज जाम कंटाळा आलाय,
आज खूप काम आहे,
आज मूड ठीक नाही!
आज शूज सापडेनात,
सकाळ सकाळी भांडण झालं,
काल रात्री झोपायला उशीर झाला,
पाय थोडे दुखत आहेत!
ही अन अशासारखी अगणित कारणे आपण नेहमी देत राहतो.
तब्बल ४६ देशांत चालण्याच्या आळशीपणा बाबत भारताचा ७ वा क्रमांक लागतो, शिवाय झालेल्या सर्वेक्षणात भारतीय स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा कमी चालतात. (अग मी काहीच खात नाही ग, तरी बघ ना वजन नुसतं वाढत चाललंय ? ह्या प्रश्नाचं उत्तर!)
बरेच भारतीय चालण्याचा व्यायाम प्रकार वयाच्या ४५ ते ५० वर्षांनंतर चालू करतात अन त्यासाठी देखील वाढलेलं वजन, नवीन निदान झालेला ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा संधिवाताचा त्रास हा बोनस crieteria असतो. कारण आजार होऊ नये म्हणून करावयाचे उपाय (preventive measures) हे आमच्या दृष्टीने तद्दन टाकाऊ, वेळ खाऊ अन कंटाळवाणी प्रक्रिया आहे अन त्यात चालणं पहिल्या नंबरला येत.
चालण्याचे फायदे
१) वजन आटोक्यात ठेवता येतं.
२) हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेहादी रोग दूर ठेवता येतात.
३) हाडे, सांधे व पेशी मजबूत होतात.
४)रोग प्रतिकार क्षमता वाढते.
५)मूड चांगला राहण्यास मदत होते (स्त्री वर्ग लक्ष द्या)
वाग्भटाचार्य आपल्या अष्टांग हृदय ग्रंथात चालणे हा मधुमेहासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणून सांगतात.
कसं चालावं
१) गप्पा मारत हसत खेळत
२)शेजारच्यांच्या, सासूच्या, बॉस च्या वा इतर लोकांन विषयीच्या चर्चा करत.
३)बागेत फिरत असल्या सारखे रमत गमत.
४)चालून जगावर उपकार करत असल्यासारखे.
५)भूत मागे लागल्यासारखे.
असे चालू नये, नाहीतर महिनाभर चालून सुद्धा काहिच फरक वाटत नाही डॉक्टर,असे तरी सांगू नये.
१)चालताना मान सरळ ठेवावी व नजर किंचित झुकलेली ठेवावी.
२)खांदे व पाठ किंचित मागे झुकलेले व सैल सोडावेत.
३)पोटाच्या पेशी नकळत आवळलेल्या व कंबर सरळ असावी.
४)टाचेपासून पुढे बोटांपर्यंत पायाचा तळवा संपूर्ण टेकवून चालावे.
लक्षात ठेवा चालण्याचा व्यायाम हा गुढघे गळ्यात येण्यापूर्वी चालू करावा, गुढघे गळ्यात येऊ नये म्हणून.